"निवडणुकीच्या आधी कोकण महामार्ग बनवा, नाही तर तुम्हाला घरी बसवणार..!" आता अशा सत्याग्रहाचीच वेळ आलेली आहे...
![]() |
येत्या निवडणुकीच्या आधी हा महामार्ग अन्य कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या तोडीचा झाला नाही तर पक्ष कोणताही असो, येत्या निवडणुकीत सर्व आमदार-खासदारांना हरवून घरी बसवायचं, असाच निर्वाणीचा निर्धार कोकणातल्या सर्व मतदारांनी करायला हवा... आणि मतदानाचा बहिष्कार करायचा नाही, खच्चून मतदान करून सगळ्या वर्तमान आमदार-खासदारांना खुर्चीवरून खालीच खेचायचं..!
गेली १०-१२ वर्षे सगळ्यांनी फक्त सबबी सांगितल्या गेल्या, पण मुंबै-गोवा संपूर्ण कोकण महामार्ग नेहमी खेडेगावच्या बैलगाडीच्या रस्त्यांपेक्षाही वाईट अवस्थेत असतो...! कैक पटीनं मोठा समृद्धि महामार्ग फक्त दोन-अडीच वर्षात सर्वस्वी नव्याने बनवल्याला टेंभा मिरवला जातो... तिथे जमिनींच्या अधिग्रहणात इंचभराचाही अडथळा आला नाही, पण कोकण महामार्गाच्या रुंदीकरणासाठी फर्लांगा-फर्लांगाच्या काही तुकड्याचं अधिग्रहण होऊ न शकल्याच्या टुकार सबबी सांगितल्या जात आहेत... अनेक सरकारं बदलली, कैक आमदार-खासदार आले-गेले... या सर्वांनी इतक्या वर्षात काय केलं, याचा जाब विचारायलाच हवा..!
यांना फक्त सत्तेच्या सारीपाटावर सोंगट्या हलवता येतात, पण कोकणाच्या गरजेचं हे एक काम मात्र टाळलंच जातंय... आता बस्स..!!
